कामठी तालुक्यातील १५ शाळाचा निकाल १०० टक्के, या वेळेस सुद्धा मुलींनी मारली बाजी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये कामठी तालुक्याचा निकाल ९०.६१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्यांनी निकाल कमी आहे. तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

कामठी तालुक्यातील ४९ शाळांमधून १२६६ मुले व १३३३ मुली असे एकूण २५९९ विघार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १०९१ मुले (८६.१७) व १२५३ मुली(९३.९९) एकूण २३४४ विघार्थी (९०.१८) उत्तीर्ण झाले. या परिक्षेमध्ये तालुक्यातील ५४६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, ८१५ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ८०७ विद्यार्थी द्धितीय श्रेणीत तर २८३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.