राज्यात 58 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, रवींद्र सिंगल नागपूरचे तर अमितेश कुमार पुण्याचे नविन पोलिस आयुक्त

राज्यातील 58 आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांची नागपूरच्या आयुक्तपदी तर अमितेश कुमार यांची पुण्याच्या आयुक्तपदी वर्णी लागली. शिवाय दत्तात्रय कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली असून ठाण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर चव्हाण तर नवी मुंबईच्या सहआयुक्तपदी संजय ऐनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांची होमगार्डचे महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर पोलीस आयुक्त म्हणून तीन वर्षे कामकाज करणारे अमितेश कुमार यांच्याकडे पुणे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर महामार्ग पोलीस दलाचे प्रमुख रवींद्र सिंगल यांना नागपूर पोलीस आयुक्त बनविण्यात आले आहे.

होमगार्ड विभागाचे उप महासमादेशक व अपर महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे नागरी सरंक्षण दलाचे संचालकपद सोपविण्यात आले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांना अपर महासंचालकपदी बढती देऊन त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी वर्णी लावली आहे. दीपक पांडे यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांना महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे.